Monthly Archives: सप्टेंबर 2011

काय रे विजू दादा?…

काय रे विजू दादा?…कसं काय सुरु आहे?… आठवण बिठवण आहे कि नाही आमची? … हा?…नवीन जागाsss…., नवीन लोकंsss…, नवीन काम भेटलं तर जुनं सगळं विसरलास तू चक्क!! …..नाही तेव्हा ‘सोन्या सोन्या’ करणारा तू आजकाल एव्हढा का बिझी झाला रे कि साधी आठवण पण काढणं होतं नाही तुझ्याकडून? …चल ठीक आहे यार,… मानलं माणूस गुंतून जातो हळू हळू आपल्याच विश्वात… मग नाही होतं भेटणं कुणाला, बोलणं कुणाशी, … साधा फोन करायला पण वेळ नाही मिळत मग … मलाही नाही राहायचा ना वेळ जेव्हा तू आठवण काढत राहायचा माझी 😛 ….  …अरे पण मी कुणाशीच नाही बोलायचो फोन वर तेव्हा…. माझे किती तरी जवळचे मित्र शिव्या घालायचे मला. शप्पत!! …विचार त्यांना नाहीतर!  ….आता दूर आल्यावर मात्र मिस करतो मी सारं 😛 …. पण मी लहान ना रे दादा… माझी चूक तू विसरून जायला पाहिजे ना?… आता असंही नाही कि तू कधी राग धरून बसला आहेस मनात…पण इतक्यात बिलकुलच भेटत नाही कि बोलत नाही ह्याचा मला मात्र राग येतो राव… इतका काय गुंतलाय स्वतःच्या विश्वात तू? … मागे इतके दिवस पुण्याला होतो तेव्हासुद्धा कधीच संबंध नाही ठेवलास, हां नंतर घरी आलो होतो तेव्हा आला होतास भेटायला आणि होता सुद्धा बरेच दिवस सोबत… पण नंतर परत गायब झालास!!

तसं मी पण गुंतलोच होतो कामात जरा इतक्यात, म्हणून मला पण काही आठवण नव्हती तुझी…  हे हे  😀 सांगूनच टाकतो म्हटलं, म्हणजे उगा तुला पण भांडायला मुद्दा नको, आमची चुकी आम्ही पहिलेच कबूल करतो बाबा 😛 …पण काय झालं ना रे, मागे एक पोस्ट वाचली एका ब्लॉग वर आणि त्यावर प्रतिसाद म्हणून मी माझ्या आयुष्यातला एक किस्सा सांगितला… ते नाही का माझा डोकं फुटलं होतं बघ अकोल्याच्या बस स्थानकावर…मग घरी येऊन मला पार टाके-बिके लावले होते …कसले भीले होते ना आई-बाबा तेव्हा! 😛 …भिणारच म्हणा…दुसरीत तर होतो मी तेव्हा. …तर तो किस्सा मी आपला त्या ब्लॉग वर सांगितला आणि मग ……   …मग मला ते बोरगांव-मंजू आठवायला लागलं, ……….आणि आता बोरगांव आठवलं तर राव, तू नाही आठवणार का भाऊ!!  कसले दिवस होते ना ते!   …दुसरीतच होतो पण पिक्चर चा भयंकर शौक होता मला तेव्हाही. आणि गावात नवीन पिक्चर नाही  लागायचे तर तू मला अकोल्याला घेऊन जायचा. ज्युरासिक पार्क च्या वेळी पहिल्या ३ मिनिटातच अगदी तो डायनासोर यायच्या आधीच मी भिलो होतो आणि तू तसाच मग मला परत घेऊन आला होतास घरी 😛 …पण नंतर माझ्यामुळे तुला पण बघता नाही आला म्हणून खूप वाईट वाटायचं मला दादा  … हे हे …लहान मनाच्या बोबड्या भावना त्या 🙂 … आता आठवतं तर हसू येतं बघ मला …आणि मी सोबत नसलो कि तू पण कुठे जायचा चित्रपट बघायला ……मला शाळेत नेणाऱ्या ऑटो जिथून निघायचा, तिथे सोडायला नेहमी यायचास तू… मस्त दिवस होते ते माझ्यासाठी  …सकाळी आई उठवून अंघोळ करून द्यायची, बाबा तयारी करून द्यायचे  …आणि मग तू यायचा   … “झाला का सोन्या तयार…?” म्हणून हाक मारायचा आणि मग आपण दोघं निघायचो 🙂 …नेहमी आईला सांगायचा कि त्या गावातलं सर्वात मोठं घर तुला बांधायचं आहे  …तुझी स्वप्नं आधीपासूनच मोठी होती ना दादा…! …नंतर बाबांची बदली झाली आणि मग ते गांव सुटलं आमचं ते नेहमी करताच…

पण तू नेहमीच येत राहिला भेटायला… सारखे फोन करत राहायचा… माझ्या ऍडमिशनच्यावेळी घरी पैसे नव्हते, बाबांनी तुझ्या कडून घेऊ म्हटलं होतं. रक्ताचं नातं नसूनही ३०,००० द्यायला तू एक क्षण देखील घेतला नव्हता. चांगलंच आठवणीत आहेत ते दिवस मला… मग पैसे घ्यायला मी बोरगावला आलो होतो. बऱ्याच वर्षानंतर आलो होतो मी त्या गावांत परत …बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या …ते घर जिथे आम्ही राहायचो, दिसायला जरी तसंच असलं, तरी आता जरा नकोसं वाटायला लागलं होतं, तिथे जायलाच मला कसंतरी वाटत होतं …लहानपणी ज्या बस स्थानकावरून बस पकडून अकोल्याला शाळेत जायचो, ते मात्र तसंच होतं …तिथे उतरल्यावर सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या तिथूनच कित्येकदा शाळेत गेलो होतो मी, तिथे असलेली दुकानं सुद्धा जशीच्या तशीच होती, काहीच बदललं नव्हतं गावात….मग जेव्हा तुझ्या घरी आलो तर तेव्हा तू स्वतःचं स्वप्नं पूर्ण केलेलं बघून मनातल्या मनातच सुखावलो होतो, गावातली सर्वात उंच घर तुझं होतं आता!  …मग मस्त जेवलो होतो तुझ्या घरी…आठवतं ना?

इंजिनियरिंग साठी पुण्यासाठी निघतांना तू आला होतास यवतमाळ वरून सोडायला …तेव्हा तू म्हणाला होतास, “सोन्या फोन करत जा…मोबाईल आहे ना?”…आणि मी नाही म्हटल्या म्हटल्या तू खिशातून तुझा मोबाईल काढून पुढे ठेवला होता …पण मी नाही म्हणालो तर तू लगेच बाबांना मला मोबाईल घेऊन जायला सांगा म्हणून म्हणत होतास…तेव्हा नाही घेतला मी, पण नंतर वाटत होतं घेऊन घायला पाहिजे होता म्हणून 😛

माझ्या चांगल्या वाईट दिवसात नेहमी आठवण काढत रहायचास… आई नेहमी सांगायची फोन वर मला, “अरे आज विजू दादाचा फोन आला होता रे, …आठवण काढत होता तुझी.”….मनात घट्ट ठरवलं होतं, कामात थोडा स्थायिक झालो कि तुझ्या घरी येऊन तुला सरप्राईज द्यायचं म्हणून. …पण तुला तर माहित आहे ना, विचार विचारच राहतात… जीवनाच्या घोडदौडीत मनाच्या जवळ असलेल्या कामांना वेळ द्यायला डोकं नेहमीच उशीर करत असतं  …त्या दिवशी पण असंच फोन आला होता आईचा …मी मित्रांसोबत पुण्याच्या चौपाटीवर उभा होतो, कुठेतरी बाहेर जेवायला जायचा कार्यक्रम आखल्या जात होता …मी आपला हसत फोन उचलला नि “हम्म, आई. बोल.” म्हटलं  …”विजुदादा गेला रे…”, येव्हढ बोलूनच आईने फोन ठेवून दिला होता … मी तर सुन्नच झालो होतो ….मित्र मैत्रिणींच्या गप्पा तश्याच रंगल्या होत्या, पण मला काहीच ऐकू येत नव्हतं…काही दिसत नव्हतं …पाणी डोळ्यातून बाहेर निघण्यासाठी धावत होतं, मी कसातरी मनाचा बांध करून त्या पुरला थांबवून ठेवलं होतं …माझ्या मनाने तर सरळ बोरागावाकडे धाव घेतली होती…सगळी जुनी चित्र डोळ्यासमोरून पटपट धावत होती….

तुला सगळेच सांगत होते, पिणं कमी कर म्हणून, पण तू ऐकत नव्हतास, कितीदा आई तुला फोन वर रागवायची, मग काही दिवसांसाठी तुझी तक्रार नाही यायची घरून… पण परत काही दिवसांनी तुझं पिणं सुरु व्हायचं …माझी चुगली माझ्या ताई जवळ करतेस म्हणून बायकोला म्हणायचास तू …पण तिची होणारी काळजी दिसायची नाही तुला …मग नंतर खूप उशीर झाला, आणि तू जास्त दिवस जगू शकत नाहीस हे सर्वाना समजून चुकलं होतं … तुझ्या पोटातून रोज एक-दीड लिटर पाणी काढलं जात होतं…”आता नाही जगत मी जास्त दिवस बाई” म्हणून आईला फोन करायचा …माझा मन तेव्हाही नाही ऐकायचं, म्हणायचं ‘अजून वेळ आहे’… पण त्यालाही माहिती होतं, कि वेळ खरंच कमी आहे म्हणून तुझ्याकडे … त्यामुळे असल्या निरोपाची खरं तर घट्ट तयारी करून ठेवली होती मनाने… पण तरीही ती त्यादिवशी अपुरीच पडली होती…वाटत होतं, स्वतःला एका कोठडीत डांबून घ्यावं आणि अश्रूंना वाट मोकळी करून रडून घ्यावं … अशावेळी का कुणास ठाऊक आयुष्यातल्या सगळ्या दुखःद घटना धावायला लागतात डोळ्यांपुढे …आपल्या आजू बाजूला गर्दी करून एक भली मोठी भिंत बांधून टाकतात आणि आपलं नातंच जणू तोडून टाकतात वर्तमानाशी…

खरं सांगतो दादा माझी अवस्था अशीच झाली होती काही दिवसांसाठी… पण नंतर वाटलं चायला तू तर आयुष्यात सगळ्याच गोष्टी हिमितीने झेलल्यास… मग मी का म्हणून कमजोर व्हावं?… उलट आता तर तू मला भेटायला कधीही, कुठेही येऊ शकत होतास… बस तुझी आठवण काढायची वेळ होती …कारण आता तू जास्त जवळ आला होतास… अगदी हाकेच्या अंतरावर… पण दादा…एक चूक किती भारी पडली बघ… तू तर निवांत सुटलास ह्या मायाजाळातून… पण आम्ही जे अजूनही इथेच अडकून आहोत, आमच्या साठी तर आयुष्यभर डोक्यात एक प्रश्न टाकून गेलास ना…कि हे असलं काही झालंच नसतं तर किती किती बरं झालं असता ना!!! …

पण जाऊ दे… आपण कशाला ह्या फालतू गोष्टी बोलतोय … तुला सांगतो आता तुझा मोन्या चांगलाच मोठा झालाय …आमच्या घरात आईला चूप करणारा तो एकमेवच प्राणी आहे …त्याने सुद्धा इंजीनियरिंगलाच अॅडमिशन घेतलीय …. मस्त मजा करताहेत कॉलेज मध्ये साहेब ….जबरी गिटार सुद्धा वाजवतो … गाणं तेव्हढ शिकला नाही लेकाचा ….आळशीच आहे माझ्यासारखा …. मी पण सध्या मस्त मजेत आहे ….मागच्या वेळीच्या टेन्शन ला पार दूर खड्ड्यात पुरून आलो आहे …. आता राजेश खन्नाने आनंद मध्ये सांगितल्या प्रमाणे ‘जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नहीं!’, हेच ब्रीदवाक्य घेऊन जगतोय …मरो लेकाच्या साऱ्या दुःखं, राग, मत्सर, निराशा सारख्या फालतू गोष्टी आता … एकाच एक आनंदामुळे चायला परत परत जेव्हा आनंद मिळत नाही तर एकाच एकाच दुःखामुळे मायला का रडत बसायचं?? …’खुश रहो और ख़ुशी फैलाओ’ …हेच ठरवलंय मी आता …बाबासुद्धा मागे कामाला कंटाळले होते बघ …पण मी स्टेबल नाही म्हणून कसे तरी नोकरी करत होते … आता त्यांनी देखील टेन्शन घेणं सोडलाय … दिलंय रीजाईन करून! …बघू म्हणतात आता पुढचं पुढे ….हा! त्यामुळे थोडी माझी टरकून आहे मात्र. 😛 … आई तर मस्त मजेत आहे … आज काल नेट वर बसून मस्त ब्लॉग वाचून काढते …. ‘जमाने के साथ अपने को भी हायटेक बनाना पडता हैं’ म्हणते …. तुझा विषय निघाला कि तेव्हढ मात्र रडते ….बायकांचं तर माहित आहेच तुला … पण तू काळजी नको करूस … मी आहे सांभाळायला तिला … तू मस्त ऐश कर वरती …. ते जग फार छान आहे म्हणतात … आणि हो पुढच्या शनिवारी खाली यायचं बघ जरा… गप्पा मारुयात!! 🙂