“चायपत्ती”

तिच्याशी माझं तसं कधी बोलणं झालं नव्हतं. तसा प्रश्नही नव्हता, कारण आम्ही एकमेकांना जाणत नव्हतो. तोंड ओळख होती केवळ आमची. नावसुद्धा माहिती नव्हतं मला तिचं. तरीही तिने मला तिच्यासोबत बाहेर चलायला विचारलं होतं. बाहेर पाऊस पडत होता नि गारवा पण बराच होता. मला खरं तर आत राहणंच आल्हाददायक वाटत होतं. पण मला हे हि तितकंच ठाऊक होतं कि ती नक्की बाहेर जाणार होती. माझ्यासोबत, किंवा एकटीच. आणि तसंही ती पहिल्यांदा काही बोलत होती. नाही म्हणणं माझ्यासाठी शक्य नव्हतं.

बंगलोर ला इंदिरा नगर मध्ये “चायपत्ती” नावाचं एक छोटंसं रेस्ट्रो आहे. मुळात कल्पना CCD सारखीच, पण इथे चहा/कॉफीचे बरेच प्रकार मिळतात. सोबत खादाडीसाठी बरेच विकल्प आहेत. वातावरण सुद्धा सुरेख जमवलेलं आहे. इथे बसल्या बसल्या तुमचा वेळ कसा निघून जातो कळतंच नाही. त्यात जर रात्र झाली असेल आणि पाऊस सुरु असेल तर इथली मजाच काही न्यारी. इथली “कुल्लड कॉफी” फार प्रसिद्ध आहे. लोक इथे विशेष करून “कुल्लड कॉफी” प्यायला जमतात. कॉलेज मध्ये जाणारे, जॉब करणारे, तरुण मुलं, मुली, जोडपे इथे आपला दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी येतात. मी मात्र इथे येतो कारण सोबत इथे बियर सुद्धा मिळते.

तिला मी पहिल्यांदा इथेच बघितलं. तिचा चेहरा तसा लक्ष वेधून घेईल असाच होता. १० लोकात उठून दिसेल असा. गोरा वर्ण. ना अगदी गोल, ना अगदी लांब, पण सुंदर असा अंडाकृती चेहरा. पाणीदार मोठाले डोळे. नाजुकशे गुलाबी ओठ. हलकेच कुरळे, पण अगदी मुलायम असे ते केस. तिच्याकडे लक्ष न गेलेच तर नवल. कित्येकदा त्या चेहऱ्याला न्याहाळत असतांना तिने मला बघितलेलं. पण तिला त्यात कधी वावगं वाटलं नसावं. किंवा तिला माझ्यासारख्यांची सवय झालेली असावी. पण माझं तिच्याकडे बघण्याचं कारण मुळात तिची सुंदरता नव्हती. ते होते तिचे डोळे. काही तरी होतं त्या टपोऱ्या डोळ्यात . कसलंतरी शल्य. प्रभा नव्हती त्यात. काहीतरी होतं जे तिला बोचत होतं. कधी कळालं नाही मला. हेच कारण होतं कि काय, ती असली कि माझी नजर प्रत्येकवेळी तिच्या त्या डोळ्यांकडे जायची.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आजही मी असाच ऑफिस मधून आल्यावर सहज “चायपत्ती” वर गेलो. वरुण राजा हलकेच पाण्याचे तुषार वर्षावत होता. वातावरणात आनंददायक असा गारवा आला होता. आणि अश्यात तिथे जाणं मी मिस करू शकत नव्हतो. मी फ्ल्याट वर येऊन लगेच फ्रेश झालो नि “चायपत्ती” वर गेलो. आज तिथे नेहमी पेक्षा जास्त गर्दी होती. पाऊस सुरु झाल्यामुळे असेल कि काय, पण आज बरीच पब्लिक जमलेली तिथे. टेबल मिळणं कठीण वाटत होतं. मी एखादा टेबल मिळतो का म्हणून एकदा सगळीकडे कटाक्ष टाकायला गेलो नि मला तेव्हढ्यात ती दिसली. आजही तशीच, एकटीच, आपल्याच विचारात मग्न बसलेली होती. मी तिच्या कडे वळलो. जवळ जाऊन तिला विचारलं, “माफ करा, मी इथे बसू शकतो का?” तिने माझ्याकडे एकदा बघितलं, हलकेच मान डोलावली नि तिच्या समोर असलेल्या खुर्चीकडे हाथ करून बसण्याचा इशारा केला. एव्हढंच. चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते तिच्या. मला बसण्याचा इशारा करून परत स्वतःच्या विचारात मग्न झाली होती ती.

तिच्यासमोर “कुल्लड कॉफी” चा मग ठेवलेला होता. तिची नजर खिडीकीतून बाहेर कुठेतरी शून्यात होती. मी माझ्यासाठी एक बियर मागवली. वेटरने माझ्यासमोर बियरचा मग आणून ठेवला. हळू हळू आम्ही आपापल्यासमोर असलेलं ड्रिंक्स पित होतो. अधून मधून मी तिच्याकडे बघत होतो. डोळे काळेशार होते तिचे. पण कुठे तरी हरवलेले. एव्हढ्या गोंगाटात बसून सुद्धा त्या टेबलावर बसून मला एक वेगळीच अशी शांतता जाणवत होती. जणू काही तरी फार वाईट झालंय, आणि दुखःच्या वातावरणात कुणी कुणाशी बोलत नाहीये, अशी. आणि ती शांतता तोडण्याची, तिच्याशी बोलण्याची हिम्मत त्यावेळी तरी माझ्यात नव्हती. तेव्हढ्यात तिथे एक मुलगा आला. त्याने तिला विचारलं ,

“Excuse me gorgeous! Can I buy you a beer?”.

“No” तिने उत्तर दिलं.

“Coffee?” त्याने पुन्हा प्रयत्न केला.

“Please go from here and leave me alone.” तिने थंडपणे त्याच्याकडे बघत उत्तर दिलं.

ते भाव  बघून कि काय, तो मुलगा निघून गेला. तिने एकवार माझ्याकडे बघितलं.

मी विचारलं, “Do you want me to leave too?”.

ती दोन क्षण थांबली. म्हणाली “Shall we go out? I need some fresh air.”

… तिच्याशी माझं तसं कधी बोलणं झालं नव्हतं. तसा प्रश्नही नव्हता, कारण आम्ही एकमेकांना जाणत नव्हतो. तोंड ओळख होती केवळ आमची. नावसुद्धा माहिती नव्हतं मला तिचं. तरीही तिने मला तिच्यासोबत बाहेर चलायला विचारलं होतं. बाहेर पाऊस पडत होता नि गारवा पण बराच होता. मला खरं तर आत राहणंच आल्हाददायक वाटत होतं. पण मला हे हि तितकंच ठाऊक होतं कि ती नक्की बाहेर जाणार होती. माझ्यासोबत, किंवा एकटीच.

मी मान डोलावली आणि आम्ही दोघं आपापले ड्रिंक्स घेऊन बाहेर आलो. बाहेर पाऊस सुरूच होता. हवेत आता जरा जास्तंच गारवा आला होता. आम्ही दोघंही बाहेर आलो. आजूबाजूची दुकानं एव्हाना बंद झालेली होती. त्यातल्याच एका दुकानाच्या शेड खाली आम्ही दोघं गेलो. ती तिथे पायऱ्यांवर बसली. मी शेजारीच उभा होतो. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. ती कॉफी घेत रस्त्याकडे बघायला लागली. ती शांतात तोडावी म्हणून कि काय, मी तिला विचारलं,

“तुला खरंच इथे बाहेर थंडीत राहायचं आहे का? आपण आतही बसू शकतो.”

तिने माझ्या कडे बघितलं. नजर परत रस्त्याकडे वळवली. कॉफीचा एक घोट घेतला आणि म्हणाली,

“मला लोकं विचारतात. तुला काय झालंय?  कुणी तुला त्रास देतं आहे का? कुणी तुला मारत, धमकावत आहे का? तू एव्हढी अबोल का असतेस?”.

खरं तर हे प्रश्न माझ्याही मनात होतेच. हो, तिला सरळ विचारू शकेल एव्हढी ओळख नव्हती आमच्यात. पण असती तर मी तिला असलंच काही विचारलं असतं. तिने माझ्याकडे बघितलं नि म्हणाली, “प्रत्येकाला माझी कहाणी जाणून घ्यायची आहे.”  “तुला काय वाटतं? काय झालं असेल माझ्यासोबत ?”

मी पहिल्यांदा तिला बोलतांना बघत होतो. पहिल्यांदा मला तिच्यात काही जिवंतपणा दिसत होता.

“मला काहीच वाटत नाही.” मी नकळत बोललो.

“खरंच?!” तिने विचारलं.

“हो खरंच.” मी उत्तर दिलं. मग हळू हळू आम्ही बोलायला लागलो. तिने सगळं काही सांगितलं. बोलतांना तिचे डोळे भरून आले होते. आवाज कापरा झाला होता. पण ती थांबली नव्हती. तिने मनातले सगळे विचार न थांबता बाहेर काढले होते. तिला त्रास देणारी, तिची कहाणी …. ती कहाणी, जी जाणून घ्यायचं कुतूहल सगळ्यांना होतं, तिने माझ्या समोर ठेवली होती. ऐकून मीही  स्तब्ध झालो होतो. सगळं सांगून झाल्यावर तिने एक दीर्घ श्वास घेतला. तिची नजर कुठेतरी हरवलेली होती. कदाचित जुन्या घटना तिच्या पुढे धावत असाव्यात. तिचे डोळे लालसर झाले होते. डोळ्यांमध्ये साठलेलं पाणी बाहेर पडू बघत होतं. तिने खरंच बरंच काही बघितलं होतं, सोसलं होतं. एव्हढं सगळं ऐकून कुणालाही तिच्याबद्दल सहानभूती नाही वाटली तरंच नवल होतं. तिने तिच्या डोळ्यांच्या ओल्या झालेल्या काठा पुसल्या. माझ्याकडे बघत ती म्हणाली, “आता सांग, काय वाटतं तुला माझी कहाणी ऐकून?”.

तिने विचारलेला प्रश्न खरं तर साधा-सरळ होता, पण त्याचं उत्तर मात्र साधं असू शकत नव्हतं. मी तिच्या शेजारी बसलो. तिच्या कडे बघून म्हटलं,

“मी सांगतो मला काय वाटतं ते. पण मला एक गोष्ट जरा स्पष्ट नाही झालीये अजून.”

“कुठली गोष्टं?” तिने लगेच विचारलं.

“तू विचार, मी सांगते.” ती म्हणाली.

मी तिच्या संपूर्ण कहाणीत तिला सर्वाधिक त्रास देणाऱ्या घटनेबद्दल विचारलं. क्षणभर थबकून तिने विचारलं, “त्याबद्दल काय स्पष्टीकरण हवंय तुला?”.

“मला तुझ्याकडून स्पष्टीकरण नकोय.” मी म्हणालो. मला ती घटना स्वतः बघायची आहे. मला माझं स्पष्टीकरण मिळून जाईल. मग मी सांगतो तुला, मला काय वाटतं ते.”

हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर किंचित राग दिसत होता. “आता तू माझी मस्करी करतो आहे.” ती म्हणाली.

“मस्करी कुठून आली आता?” मी म्हणालो. “आपण जाऊयात कि तिथे. मला बघू दे नेमकं काय झालं होता तेव्हा.”

“पण तिथे जाऊन काही मिळणार आहे का तुला?”, ती म्हणाली. “तिथे कुणी नसणार आहे आता.”

“अरे पण ते तिथेच घडलं होतं ना?” मी परत विचारलं.

“अरे हो. पण, झालं ते झालं. त्या घटनेला होऊन आता वर्षाधिक झालंय. आता तिचं ….तिचं … ”

…. एव्हढं म्हणून ती थांबली. नि माझ्याकडे बघायला लागली. मी हलकेच हसत म्हटलं, “अस्तित्व नाही. होय ना?”.

आता ती माझ्याकडे एकटक बघत होती. मी बोलायला लागलो, ” तू  जेही काही सांगितलं. शेवटी कहाणीच ती. तिला अस्तित्व नाही. तिला चेहरा नाही. तिला मन नाही. तिला भावना नाहीत. ती आहे तर, निव्वळ एक कहाणी.”

नजर दुसरीकडे वळवून तिने क्षणभर काहीतरी विचार केला. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच अगदी हलकी अशी प्रसन्नतेची झलक दिसत होती. ती हलकेच हसली, नि म्हणाली, “खरंय, कहाणीच ती शेवटी. कहाणी जी आपण उगीचंच  परत परत जगत असतो.”

“नाही.” मी हसून म्हटलं. “कहाणी, ज्यातून आपण घडत असतो.”

Posted on ऑक्टोबर 30, 2012, in कथा, मनातलं..., मराठी, हलकं-फुलकं, personal and tagged , , , . Bookmark the permalink. 20 प्रतिक्रिया .

  1. zakaasss….chan jamalay mitra…..kay zala hota bichari sobat tarihi…..I liked d way u conveyed ‘Move on’!!

  2. मस्तच …. दुसरा भाग पण होईल यावर. 😉

    • छे छे! .. अहो मला कुठे जमतंय कथा लिहायला.

      हिच पोस्ट कशी वाटतेय लोकांना, ते बघतोय मी.
      लेख आवडला, आणि त्याची प्रतिक्रिया दिली, ह्याबद्दल मनःपूर्वक आभार.

      आणि हो, ब्लॉग वर स्वागत बरं का आनंद! 🙂
      येत राहा. 🙂

  3. अप्रतिम कथा लेखनाचा नमुना

  4. अभिप्राय देणया इतका मी मोठा नाही. पण तुझ्याकडे खुप सगळी विचार करण्याची शक्ति आहे, आणि त्याचा सदुपयोग येथे पाहावयास मिळतो. भाषाशैली इतकी सोपी आणि सरळ आहे की लेखकाचे आणि वाचकाचे थेट मनोमिलन होते, त्यामुळे हे कथारुपी साहित्य वाचावेसे वाटते.
    शुभेच्छा!!!!
    कुलदीप ….

  5. मस्त जमलंय… 🙂
    …स्टोरीच्या पार्ट २ ची आतुरतेने वाट पाहत आहोत…

  6. Vaibhya changalay lihalay… agadi mothya marathi lekhaka sarakha.

  7. hey vaibhav hi………….. kharach khup sadhi saral gosht ahe hi.. pn titkich manala bhidnari…

Leave a reply to वैभव टेकाम/Vaibhav Tekam उत्तर रद्द करा.