Category Archives: कथा

“चायपत्ती”

तिच्याशी माझं तसं कधी बोलणं झालं नव्हतं. तसा प्रश्नही नव्हता, कारण आम्ही एकमेकांना जाणत नव्हतो. तोंड ओळख होती केवळ आमची. नावसुद्धा माहिती नव्हतं मला तिचं. तरीही तिने मला तिच्यासोबत बाहेर चलायला विचारलं होतं. बाहेर पाऊस पडत होता नि गारवा पण बराच होता. मला खरं तर आत राहणंच आल्हाददायक वाटत होतं. पण मला हे हि तितकंच ठाऊक होतं कि ती नक्की बाहेर जाणार होती. माझ्यासोबत, किंवा एकटीच. आणि तसंही ती पहिल्यांदा काही बोलत होती. नाही म्हणणं माझ्यासाठी शक्य नव्हतं.

बंगलोर ला इंदिरा नगर मध्ये “चायपत्ती” नावाचं एक छोटंसं रेस्ट्रो आहे. मुळात कल्पना CCD सारखीच, पण इथे चहा/कॉफीचे बरेच प्रकार मिळतात. सोबत खादाडीसाठी बरेच विकल्प आहेत. वातावरण सुद्धा सुरेख जमवलेलं आहे. इथे बसल्या बसल्या तुमचा वेळ कसा निघून जातो कळतंच नाही. त्यात जर रात्र झाली असेल आणि पाऊस सुरु असेल तर इथली मजाच काही न्यारी. इथली “कुल्लड कॉफी” फार प्रसिद्ध आहे. लोक इथे विशेष करून “कुल्लड कॉफी” प्यायला जमतात. कॉलेज मध्ये जाणारे, जॉब करणारे, तरुण मुलं, मुली, जोडपे इथे आपला दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी येतात. मी मात्र इथे येतो कारण सोबत इथे बियर सुद्धा मिळते.

तिला मी पहिल्यांदा इथेच बघितलं. तिचा चेहरा तसा लक्ष वेधून घेईल असाच होता. १० लोकात उठून दिसेल असा. गोरा वर्ण. ना अगदी गोल, ना अगदी लांब, पण सुंदर असा अंडाकृती चेहरा. पाणीदार मोठाले डोळे. नाजुकशे गुलाबी ओठ. हलकेच कुरळे, पण अगदी मुलायम असे ते केस. तिच्याकडे लक्ष न गेलेच तर नवल. कित्येकदा त्या चेहऱ्याला न्याहाळत असतांना तिने मला बघितलेलं. पण तिला त्यात कधी वावगं वाटलं नसावं. किंवा तिला माझ्यासारख्यांची सवय झालेली असावी. पण माझं तिच्याकडे बघण्याचं कारण मुळात तिची सुंदरता नव्हती. ते होते तिचे डोळे. काही तरी होतं त्या टपोऱ्या डोळ्यात . कसलंतरी शल्य. प्रभा नव्हती त्यात. काहीतरी होतं जे तिला बोचत होतं. कधी कळालं नाही मला. हेच कारण होतं कि काय, ती असली कि माझी नजर प्रत्येकवेळी तिच्या त्या डोळ्यांकडे जायची.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आजही मी असाच ऑफिस मधून आल्यावर सहज “चायपत्ती” वर गेलो. वरुण राजा हलकेच पाण्याचे तुषार वर्षावत होता. वातावरणात आनंददायक असा गारवा आला होता. आणि अश्यात तिथे जाणं मी मिस करू शकत नव्हतो. मी फ्ल्याट वर येऊन लगेच फ्रेश झालो नि “चायपत्ती” वर गेलो. आज तिथे नेहमी पेक्षा जास्त गर्दी होती. पाऊस सुरु झाल्यामुळे असेल कि काय, पण आज बरीच पब्लिक जमलेली तिथे. टेबल मिळणं कठीण वाटत होतं. मी एखादा टेबल मिळतो का म्हणून एकदा सगळीकडे कटाक्ष टाकायला गेलो नि मला तेव्हढ्यात ती दिसली. आजही तशीच, एकटीच, आपल्याच विचारात मग्न बसलेली होती. मी तिच्या कडे वळलो. जवळ जाऊन तिला विचारलं, “माफ करा, मी इथे बसू शकतो का?” तिने माझ्याकडे एकदा बघितलं, हलकेच मान डोलावली नि तिच्या समोर असलेल्या खुर्चीकडे हाथ करून बसण्याचा इशारा केला. एव्हढंच. चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते तिच्या. मला बसण्याचा इशारा करून परत स्वतःच्या विचारात मग्न झाली होती ती.

तिच्यासमोर “कुल्लड कॉफी” चा मग ठेवलेला होता. तिची नजर खिडीकीतून बाहेर कुठेतरी शून्यात होती. मी माझ्यासाठी एक बियर मागवली. वेटरने माझ्यासमोर बियरचा मग आणून ठेवला. हळू हळू आम्ही आपापल्यासमोर असलेलं ड्रिंक्स पित होतो. अधून मधून मी तिच्याकडे बघत होतो. डोळे काळेशार होते तिचे. पण कुठे तरी हरवलेले. एव्हढ्या गोंगाटात बसून सुद्धा त्या टेबलावर बसून मला एक वेगळीच अशी शांतता जाणवत होती. जणू काही तरी फार वाईट झालंय, आणि दुखःच्या वातावरणात कुणी कुणाशी बोलत नाहीये, अशी. आणि ती शांतता तोडण्याची, तिच्याशी बोलण्याची हिम्मत त्यावेळी तरी माझ्यात नव्हती. तेव्हढ्यात तिथे एक मुलगा आला. त्याने तिला विचारलं ,

“Excuse me gorgeous! Can I buy you a beer?”.

“No” तिने उत्तर दिलं.

“Coffee?” त्याने पुन्हा प्रयत्न केला.

“Please go from here and leave me alone.” तिने थंडपणे त्याच्याकडे बघत उत्तर दिलं.

ते भाव  बघून कि काय, तो मुलगा निघून गेला. तिने एकवार माझ्याकडे बघितलं.

मी विचारलं, “Do you want me to leave too?”.

ती दोन क्षण थांबली. म्हणाली “Shall we go out? I need some fresh air.”

… तिच्याशी माझं तसं कधी बोलणं झालं नव्हतं. तसा प्रश्नही नव्हता, कारण आम्ही एकमेकांना जाणत नव्हतो. तोंड ओळख होती केवळ आमची. नावसुद्धा माहिती नव्हतं मला तिचं. तरीही तिने मला तिच्यासोबत बाहेर चलायला विचारलं होतं. बाहेर पाऊस पडत होता नि गारवा पण बराच होता. मला खरं तर आत राहणंच आल्हाददायक वाटत होतं. पण मला हे हि तितकंच ठाऊक होतं कि ती नक्की बाहेर जाणार होती. माझ्यासोबत, किंवा एकटीच.

मी मान डोलावली आणि आम्ही दोघं आपापले ड्रिंक्स घेऊन बाहेर आलो. बाहेर पाऊस सुरूच होता. हवेत आता जरा जास्तंच गारवा आला होता. आम्ही दोघंही बाहेर आलो. आजूबाजूची दुकानं एव्हाना बंद झालेली होती. त्यातल्याच एका दुकानाच्या शेड खाली आम्ही दोघं गेलो. ती तिथे पायऱ्यांवर बसली. मी शेजारीच उभा होतो. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. ती कॉफी घेत रस्त्याकडे बघायला लागली. ती शांतात तोडावी म्हणून कि काय, मी तिला विचारलं,

“तुला खरंच इथे बाहेर थंडीत राहायचं आहे का? आपण आतही बसू शकतो.”

तिने माझ्या कडे बघितलं. नजर परत रस्त्याकडे वळवली. कॉफीचा एक घोट घेतला आणि म्हणाली,

“मला लोकं विचारतात. तुला काय झालंय?  कुणी तुला त्रास देतं आहे का? कुणी तुला मारत, धमकावत आहे का? तू एव्हढी अबोल का असतेस?”.

खरं तर हे प्रश्न माझ्याही मनात होतेच. हो, तिला सरळ विचारू शकेल एव्हढी ओळख नव्हती आमच्यात. पण असती तर मी तिला असलंच काही विचारलं असतं. तिने माझ्याकडे बघितलं नि म्हणाली, “प्रत्येकाला माझी कहाणी जाणून घ्यायची आहे.”  “तुला काय वाटतं? काय झालं असेल माझ्यासोबत ?”

मी पहिल्यांदा तिला बोलतांना बघत होतो. पहिल्यांदा मला तिच्यात काही जिवंतपणा दिसत होता.

“मला काहीच वाटत नाही.” मी नकळत बोललो.

“खरंच?!” तिने विचारलं.

“हो खरंच.” मी उत्तर दिलं. मग हळू हळू आम्ही बोलायला लागलो. तिने सगळं काही सांगितलं. बोलतांना तिचे डोळे भरून आले होते. आवाज कापरा झाला होता. पण ती थांबली नव्हती. तिने मनातले सगळे विचार न थांबता बाहेर काढले होते. तिला त्रास देणारी, तिची कहाणी …. ती कहाणी, जी जाणून घ्यायचं कुतूहल सगळ्यांना होतं, तिने माझ्या समोर ठेवली होती. ऐकून मीही  स्तब्ध झालो होतो. सगळं सांगून झाल्यावर तिने एक दीर्घ श्वास घेतला. तिची नजर कुठेतरी हरवलेली होती. कदाचित जुन्या घटना तिच्या पुढे धावत असाव्यात. तिचे डोळे लालसर झाले होते. डोळ्यांमध्ये साठलेलं पाणी बाहेर पडू बघत होतं. तिने खरंच बरंच काही बघितलं होतं, सोसलं होतं. एव्हढं सगळं ऐकून कुणालाही तिच्याबद्दल सहानभूती नाही वाटली तरंच नवल होतं. तिने तिच्या डोळ्यांच्या ओल्या झालेल्या काठा पुसल्या. माझ्याकडे बघत ती म्हणाली, “आता सांग, काय वाटतं तुला माझी कहाणी ऐकून?”.

तिने विचारलेला प्रश्न खरं तर साधा-सरळ होता, पण त्याचं उत्तर मात्र साधं असू शकत नव्हतं. मी तिच्या शेजारी बसलो. तिच्या कडे बघून म्हटलं,

“मी सांगतो मला काय वाटतं ते. पण मला एक गोष्ट जरा स्पष्ट नाही झालीये अजून.”

“कुठली गोष्टं?” तिने लगेच विचारलं.

“तू विचार, मी सांगते.” ती म्हणाली.

मी तिच्या संपूर्ण कहाणीत तिला सर्वाधिक त्रास देणाऱ्या घटनेबद्दल विचारलं. क्षणभर थबकून तिने विचारलं, “त्याबद्दल काय स्पष्टीकरण हवंय तुला?”.

“मला तुझ्याकडून स्पष्टीकरण नकोय.” मी म्हणालो. मला ती घटना स्वतः बघायची आहे. मला माझं स्पष्टीकरण मिळून जाईल. मग मी सांगतो तुला, मला काय वाटतं ते.”

हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर किंचित राग दिसत होता. “आता तू माझी मस्करी करतो आहे.” ती म्हणाली.

“मस्करी कुठून आली आता?” मी म्हणालो. “आपण जाऊयात कि तिथे. मला बघू दे नेमकं काय झालं होता तेव्हा.”

“पण तिथे जाऊन काही मिळणार आहे का तुला?”, ती म्हणाली. “तिथे कुणी नसणार आहे आता.”

“अरे पण ते तिथेच घडलं होतं ना?” मी परत विचारलं.

“अरे हो. पण, झालं ते झालं. त्या घटनेला होऊन आता वर्षाधिक झालंय. आता तिचं ….तिचं … ”

…. एव्हढं म्हणून ती थांबली. नि माझ्याकडे बघायला लागली. मी हलकेच हसत म्हटलं, “अस्तित्व नाही. होय ना?”.

आता ती माझ्याकडे एकटक बघत होती. मी बोलायला लागलो, ” तू  जेही काही सांगितलं. शेवटी कहाणीच ती. तिला अस्तित्व नाही. तिला चेहरा नाही. तिला मन नाही. तिला भावना नाहीत. ती आहे तर, निव्वळ एक कहाणी.”

नजर दुसरीकडे वळवून तिने क्षणभर काहीतरी विचार केला. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच अगदी हलकी अशी प्रसन्नतेची झलक दिसत होती. ती हलकेच हसली, नि म्हणाली, “खरंय, कहाणीच ती शेवटी. कहाणी जी आपण उगीचंच  परत परत जगत असतो.”

“नाही.” मी हसून म्हटलं. “कहाणी, ज्यातून आपण घडत असतो.”

वेळ

(कथा लिहायचा पहिलाच प्रयत्न. प्रतिसाद, सूचना, सुधारणा, शिव्या …अगदी काहीही …. येऊ द्यात. 😉 )

कुळकर्णी साहेबांना निवृत्त होऊन तशी ३ वर्षे झाली होती. मातृभूमी दैनिकाच्या संपादकाचं पद त्यांनी गेली वीस वर्ष अगदी यशस्वीपणे सांभाळलं होतं. जुनाट शैली असलेल्या चौकोनी फ्रेमच्या मोठ्या चष्म्या मागे राहणाऱ्या त्या बारीक डोळ्यांनी आयुष्यातले अगणित चढाव उतार बघितले होते. आणि लांबसडक, मोठे असलेल्या त्यांच्या बोटांनी ती सगळी अनुभवं कागदावर अगदी यशस्वीपणे उतरवली होती. कुळकर्णी साहेबांची ताकद होती त्यांच्या खरेपणात! लिखाणाची आवड तर त्यांना लहानपणापासूनच होती. त्यांनी लिहिलेल्या कथा सगळ्यांनाच आवडायच्या. सगळेच त्यांना ‘लिहिणे सोडू नकोस’ म्हणून सांगत राहायचे. पण लेखक म्हणून कारकीर्द निवडणं जरा जास्तच धोक्याचं वाटायचं त्यांना. जोवर लेखणी चालते आहे, लोकांना लिखाण आवडतं आहे. तोवर ठीक आहे. पण नंतर काय? एकदा लोक कंटाळले तर मग? बरेचदा लोकं अमुक एका शैलीचे स्वागत जोऱ्यात करतात, कारण तेव्हा त्यांना ती नवीन वाटत असते. पण नंतर ते कंटाळून जातात आणि मग त्यांना बदल हवा असतो. असेच, लोकं जर आपल्या लिखाणाला कंटाळले तर? मग प्रकाशक कुठून शोधायचा? पोट कसे भरायचे? ह्या पेक्षा दुसरं कुठलं तरी काम शोधावं, असं त्यांना नेहमी वाटे. पण लिखाणाची ओढ त्यांना दुसरा काम करू पण नाही देई. बरं, ह्यांचं लिखाण जरी चांगलं असलं, तरी, स्वतःच्या सर्जनशिलतेवर त्यांना कुठे तरी संदेह होता. तसंही त्यांचे जे काही लिखाण लोकांनी पसंद केलं होतं, ते सगळं खऱ्या-खुऱ्या अनुभवातून प्रकटलं होतं. त्यांनाही आयुष्यात झालेल्या खऱ्या प्रसंगांनाच कागदावर उतरवायला आवडे. त्यातून मिळालेला अनुभव दुसऱ्यांपर्यंत पोह्चावाण्याचाच प्रयत्न असायचा त्यांचा. झालेल्या प्रसंगाला तिखट-मीठ लावून लिहणं त्यांना जमत नसे. असं नाही कि त्यांनी प्रयत्न करून पहिले नव्हतं. पण मग ते लिखाण थेट मनातून नाही येई. आणि मग ते समोरच्याच्या काळजाला भिडत नसे. त्यामुळे शेवटी त्यांनी पत्रकार होण्याचं ठरवलं होतं. लिहिण्याचं कौशल्य त्यांचाकडे जन्मजात होतंच. बस बातम्या मिळविण्याच काम करायचं होतं. आणि आशा प्रकारे ते ह्या पेश्यात आले होते.

निवृत्तीनंतरही त्यांचे चाहते नेहमी त्यांच्या लेखांची आठवण काढायचे. मग अधून मधून कुळकर्णी साहेब सुद्धा एखाद-दुकटा लेख पाठवून देत नव्या संपादकाकडे. पण आज काल त्यांना काय लिहावं सुचतच नव्हतं. बरीच महिने उलटून गेली होती, आणि त्यांनी लेखणीला हाथ नव्हता लावला. ते वाट बघत होते, आयुष्यात घडणाऱ्या एखाद्या भारी घटनेची. जी त्यांच्या काळजाला भिडेल. तेव्हाच ते त्यांच्या नावाला शोभेल असं लेख लिहू शकत होते.

पण एक संपादक म्हणून जेव्हढ त्यांनी वाचकांना दिलं होतं तेव्हढंच त्यांनी स्वतःच्या घरच्यांना कमी दिलं होतं. कुळकर्णी बाई मोजून ३०-४० वेळा जेवल्या असतील साहेबांसोबत अक्ख्या आयुष्यात. कारण कुळकर्णी साहेब कधी वेळेवर घरी गेलेच नव्हते. नव्हे, त्यांना वेळेचं भानच राहायचं नाही कामाला लागल्यावर. स्वतःच्या मुलांना, त्यांनी अंथरुणातच मोठं होतांना जास्त बघितलं होतं. बाकी त्यांनी घरच्यांना कधीच कुठल्याच गोष्टीची कमी होऊ दिली नव्हती. ना कधी कुठली गोष्ट करण्यापासून रोक लावली होती. उभ्या आयुष्यात त्यांचं त्यांच्या सौ. शी, किंवा मुलांशी वाद झाला नव्हता. मुलही बापाचं कामाप्रती वेड बघून त्यांना कधी सतावत नसत. ते त्यांच्या आईच्याच जास्त जवळ होते. आणि कधीही, कुणीही, एकमेकांकडे कुळकर्णी साहेब त्यांना न देऊ शकणाऱ्या वेळा बद्दल तक्रार केली नव्हती.  त्यांचा मोठा मुलगा सुधीर सध्या स्यान फ्रान्सिस्को ला कामाला होता. विप्रो मध्ये वेबलॉजिक च्या प्रोजेक्ट वर तो टेक लीड होता. पैसा चांगला मिळत होता. काम देखील निवांत होतं. अस्मिता सारखी सुंदर बायको आणि एक ३ वर्षाची गोंडस मुलगी सई, असा त्याचा लहानसा संसार होता. सगळे  तिथेच स्यान फ्रान्सिस्को ला राहायचे. सईचा जन्म देखील तिथेच झाला होता. सुधीर रोज कुळकर्णी बाईंना कॉल करायचा. निदान तास भर तरी गप्पा चाले त्यांच्या. अजूनही ममाज बॉय आहे म्हणून अस्मिता चिडवायची त्याला अधून मधून. पण उगाच नवरा सासूच्या आज्ञेत आहे, म्हणून जळणारी टिपिकल सून ती कधी झाली नव्हती. उलट तिला सुद्धा असं दूर राहणं बिलकुल आवडत नव्हतं. एका घरात शक्य नसेल तर निदान सगळे एका गावात तरी असावेत अशी तिची इच्छा.

तसंही कुळकर्णी साहेब आणि कुळकर्णी बाईंचं आता वय झालं होतं. उतारवयात काळजी घेणारं त्यांच्याजवळ कुणीच नव्हतं. लहाना, प्रदीप,  मुंबईला सी टी एस मध्ये होता. त्याला कामाला लागून इन बिन ४ वर्षे झाली होती. लग्न व्हायचं होतं. आणि मुंबई सारख्या शहरात इतक्या लवकर स्थाईक होण्याची कुणी त्याच्या कडून अपेक्षा करत नव्हतं. पण तरीही त्याने आई बाबांना कित्येकदा मुंबई ला स्वतःजवळ बोलावलं होतं. पण कुळकर्णी साहेबांना त्यांचं कोल्हापूर सुटत नव्हतं. ते मुंबई ला स्थाईक व्हायला तयारच नव्हते.

कोल्हापूरची बातच तशी न्यारी होती. पु.लं.नी जसे मुंबईकर, पुणेकर अन नागपूरकरांचे वर्णन केलं होतं. कोल्हापूरकर हे सुद्धा असेच वर्णन्याजोगे लोकं होते. ह्या लोक्कांना तुम्ही कधीच रागात बघू शकत नव्हते. दुःख, द्वेष, तणाव अशा नकारात्मक गोष्टींशी जणू ह्या लोकांचा संबंधच नव्हता मुळी. हि मंडळी नेहमीच खुशमिजाज, मस्करी करणारी होती. बंधुभाव जेव्हढा ह्या लोकात दिसायचा तो कुठे शोधूनही सापडू शकत नव्हता. ह्या लोकांमध्ये कुणालाही भाऊ बनवण्याची क्षमता होती. ज्याला त्याला हि लोकं ‘भाSSवाSS’  म्हणून हाक मारायची. कुणा बाहेरच्याला ह्यांच्याशी वाद घालणं हि देखील कठीणच गोष्ट होती. ह्यांना शिवी देणं हि एक स्पर्धा वाटायची. जी ते फार स्पोर्टी स्पिरीटने घ्यायची. ह्यांना जर कुणी शिवी दिली तर, एक तर त्या व्यक्तीने दिलेल्या शिवी पेक्षा अधिक उच्च पातळीची शिवी हासडायची आणि जिंकलो ह्या अविर्भावात हसायची. नाही तर ‘काय जोरदार शिवी दिलीस भावड्या!!’ म्हणून खुश व्हायची. पण राग ह्यांना येतच नसे. अशा ठिकाणी खरं तर अक्खा कुळकर्णी परिवार रमला होता इतकी वर्षे, आणि आता कुळकर्णी साहेबांना तिथून हलणं शक्य वाटत नव्हतं. पण कुळकर्णी बाईंच मन मात्र लेकांसाठी तुटत होतं. त्या कुठेही राहायला तयार होत्या. फक्त मुलं सोबत हवी होती. अशीही त्यांना त्यांचीच जास्त सोबत लाभली होती आयुष्यात.

कुळकर्णी साहेब दररोज सकाळी बागेत जायचे. हा त्यांचा नित्यक्रम होता निवृत्त झाल्या पासून. तिथे ते कधी कधी तासान तास बसायचे. काय लिहावे, कश्यावर लिहावे. ह्याबद्दल विचार करत राहायचे. आणि आता तर बऱ्याच दिवसांपासून काही लिहिले नसल्यामुळे त्यांना लेख लिहियाची जरा घाईच झाली होती. मग ते उगाच इकडच्या तिकडच्या घटना आठवून काहीतरी जुळवायचा प्रयत्न करायचे. मनातल्या मनात लेखाचा आराखडा तयार करायचे. पण लिखाण मनापासून येत नसल्यामुळे ते काही त्यांच्या मनाला साजेसं होतं नसे. मग ते सगळे विचार ते मनाच्या पाटीवरून रागाने पुसून टाकत असत. आजही ते बागेत बसून बऱ्याच वेळापासून विचार करीत होते. आता तर शेवटी लेख लिहू शकू कि नाही अशी शंका त्यांच्या मनात येत होती. ‘छ्या!! काय साला रोजची कटकट लावून घेतली आहे डोक्याला. काही दिवस ब्रेक घ्यावा. आज बाग बघुयात.’ असे स्वतःस म्हणून कुळकर्णी साहेबांनी लेख लिहिण्याचा विचार बाजूला सारला.  रोज बागेत तासंतास घालवून देखील त्यांनी बाग कधी नीट न्याहाळली नव्हती. आता ते बागेत आलेल्या लोकांकडे बघत होते. तिथे असलेल्या पाण्याच्या फवाऱ्याने त्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पाण्याच्या थेबांच्या चाललेल्या मोहक खेळामध्ये ते रमून गेले होते. तेवढ्यात त्यांचं लक्ष त्या फवाऱ्याच्या मागे असलेल्या दोन व्यक्तींकडे गेले. चाळीशीच्या जवळ पोहचलेल्या एक माणूस एका ८-१० वर्ष्याच्या लहान मुला बरोबर खेळत होता. त्या मुलाच्या पायाला काही बाधा झालेली असावी, कारण तो नीट चालू शकत नव्हता. पण त्याचं ते लंगडे पण कुठेच त्याच्या खेळाच्या आड येत नव्हतं. त्याच्या डोळ्यातली चमक कुठेच कमजोर वाटत नव्हती. तो अगदी आनंदाने त्या माणसा सोबत खेळत होता. कुळकर्णी साहेबांना लगेच प्रदीपचं लहानपण आठवलं. प्रदीप नेहमीच बागेत चलायचा हट्ट करायचा कुळकर्णी साहेबांजवळ. पण ते कामाच्या व्यापात कधी त्याला घेऊन जाऊ शकले नव्हते. एखाद वेळी गेलेच तरी त्यासोबत त्यांनी जास्त वेळ घालवला नव्हता. समोर खेळत असलेल्या त्या दोन जीवांना बघून कुळकर्णी साहेबांना काहीतरी अनमोल गमावल्याचं दुःख झालं. पण त्याच क्षणी लेकाने कधी त्या गोष्टीचा राग मनात धरला नाही ह्याचं कौतुकही वाटलं. आपण खरच किती भाग्यवान आहोत ह्याचा प्रत्यय त्यांना आला. मग ते हळूच उठून ती दोन व्यक्ती खेळत होती त्या जागेच्या सर्वात जवळ असलेल्या बाकडावर जाऊन बसले. त्यांच्या मनात त्या दोघांचा संवाद ऐकण्याचं कुतुहूल निर्माण झालं होतं. त्यातूनच एखादा लेख तयार होईल असा त्यांना वाटायला लागलं होतं. ते त्या बाकाडावर जाऊन बसलेच असतील तोच त्या माणसाचा मोबाईल वाजला. त्याने कॉल रिसीव केला, “हो रमण, बोल.” त्याने म्हटलं. तिकडून काहीतरी निरोप आला. “ठीक आहे त्यांना बसवून ठेव. काही लागलं-बिगलं बघ. मी पोहोचतोच १५ मिनिटात.” म्हणत त्याने फोन ठेवला. ते ऐकून एव्हढ्या वेळ त्या माणसाच्या संभाषणाकडे नीट लक्ष देऊन ऐकणारा तो लहान मुलगा बोलला, “पण बाबा, मला अजून खेळायचं आहे.”

तो माणूस हसला आणि बोलला, “खेळुयात कि! मी जाईल थोडं उशिरा.”  आणि ते परत खेळायला लागले. खेळता खेळता अर्धा तास झाला नि त्याच्या मोबाईल परत वाजला. त्याने फोन उचलला आणि बोलला, “अरे मी जरा कामात गुंतलो होतो रे, बस आलोच मी.” असं म्हणून त्याने फोन ठेवलाच असेल तोच त्याचा मुलगा परत बोलला, “बाबा, आपण खेळणार होतो ना!”. त्यावर तो माणूस म्हणाला, “खेळतोय कि आपण बेटा. आता आपण निघायला हवं. मला पण काम आहेत थोडे.” कुठे उशीर करावा नि कुठे नाही हे त्या माणसाला नक्कीच आपल्यापेक्षा जास्त माहित आहे असं कुळकर्णी साहेबांना वाटलं. त्या माणसाच्या पेहरावाकडे बघून तो नक्कीच कुण्या उच्च पदावर असणार असं वाटत होतं. ज्या अर्थी त्याने समोरच्या व्यक्तीला बसवून ठेवण्यास सांगितलं, म्हणजेच ह्याची कुठली मिटिंग असावी असं दिसत होतं. पण पोराच्या हट्टाला लगेच नाही म्हणण्यापेक्षा मिटींगला थोडं उशिरा पोहोचणं त्याला जास्त सोपं वाटलं आणि ते खरंच उचित देखील होतं. आपण हे का नाही करू शकलो असा एक विचार चटकन कुळकर्णी साहेबांच्या डोक्यात आला. तेवढ्यात समोरून आवाज आला, “पण बाबा मला अजून खेळायचं आहे. मला खूप मज्जा येत आहे.” तो मुलगा मानायला तयारच नव्हता. आता त्या माणसाच्या उत्तराकडे कुळकर्णी साहेबांचं सगळं लक्ष लागलं होतं. मुलाची समजूत घालून तर त्याने बघितलीच होती. पण मुलाचा हट्ट सुरूच होता. आता तो बाप काय करतो आहे हे साहेबांना बघायचं होतं. “ठीक आहे आपण खेळुयात अजून थोडं वेळ…”, तो माणूस पुटपुटला. कुळकर्णी साहेबांना थोडं आश्चर्यच वाटलं. त्यांना बहुदा ते उत्तर अपेक्षित नसावं. असं केल्यानं उलट तो मुलगा अजून हट्टी बनेल असं साहेबांना वाटायला लागलं. तो माणूस तिथून जायच्या आधी त्याच्याशी नक्की बोलायचं हे कुळकर्णी साहेबांनी मनोमन ठरवलं. आणि ते त्यांच्या निघण्याची वाट बघायला लागलेत. पण कदाचित त्यांच्या नशिबात त्या माणसासोबत बोलणं इतक्या लवकर लिहिलं नव्हतं. कारण त्या नंतर त्या माणसाला ३-४ कॉल्स येऊन गेले होते. आणि प्रत्येक वेळी तो त्या पोराच्या हट्टापायी थांबला होता. आता मात्र न राहवून कुळकर्णी साहेब त्या माणसासोबत बोलायला उठले.

त्याच्या जवळ जाऊन त्यांनी त्याला हाक मारली,
“माफ करा. मी ए. डि. कुळकर्णी. मातृभूमी दैनिकाचा संपादक.”
“ओह.” तो माणूस बोलायला लागला. “तुम्हाला प्रत्यक्ष कधी बघितलं नव्हतं. मात्र तुमचे लेख नेहमीच वाचतो मी. मी, डि.सी. गोयनका. माझा कापडाचा नि दागिन्यांचा छोटासा व्यापार आहे.”
“मी तुम्हाला मागच्या २ तासा पासून बघतो आहे. माफ कराल, कदाचित चुकीचं असेल. पण तुम्हला फोन येत होते. आणि तुम्ही प्रत्येक वेळी येतो म्हणून इथेच मुला सोबत खेळत होते. म्हणून विचारावसं वाटलं.” कुळकर्णी साहेबांनी एकदाच विचारून टाकलं.
थोडं हसून…“काही होत नाही हो …”, गोयनका साहेब बोलायला लागले.
“हा माझा लहाना मुलगा, समीर. माझ्या बायकोचं नाव स्वाती आणि मोठ्या मुलीचं प्रिया. मी नेहमीच कामाला प्राधान्य दिलं साहेब. इतका कि मी कुटुंबाला कधी वेळच दिला नाही. स्वाती नेहमी म्हणायची ‘अहो, निदान रात्रीच्या जेवणाला तरी सोबत राहत जा’ . पण मी कामातून वेळच काढू नाही शकायचो. माझ्या हिशोबानी मी तिला माझी वाट न बघण्याची सुट दिली होती. खरेदीसाठी, घानिष्टांच्या भेटीला माझ्याशिवाय जाण्याची मोकळीक दिली होती. नंतर उमगलं किती चुकीची समजूत होती ती माझी. मुलांच्या शिक्षणाकडे सुध्धा मला कधी लक्ष द्यावं लागला नाही साहेब. सगळं तिनेच सांभाळलं. ती फक्त मी घरच्यांसाठी कमी वेळ काढतो एव्हढंच म्हणायची. पण त्यासाठी कधी भांडण नाही झालेत आमच्यात. जशी मुलगी मोठी झाली तेव्हा ती पण म्हणायची, ‘बाबा, मी तुमच्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये कामा नंतर येते असंच मला वाटतं.’ तेव्हा मला तिचा राग नाही यायचा. उलट हसू यायचं. कारण मी हे सगळं तिच्यासाठीच तर करत होतो. हा एव्हढा पैसा शेवटी मी कुणासाठी कमवत होतो? आणि मला ठाऊक होतं कि एक दिवस तिला पण हे समजेल म्हणून. पण सध्या तरी ती तुम्ही माझ्या सोबत एक दिवस तरी सोबत घालवा बाबा म्हणूनच रागवायची.” गोयनका साहेब हसून सांगत होते.

ते पुढे सांगायला लागले, “आणि नंतर मी एक पूर्ण दिवस त्यांच्या सोबत घालवला साहेब. माझ्या कुटुंबासोबत. त्यादिवशी मी माझी सारी कामे खड्ड्यात घातली आणि पूर्ण वेळ त्यांच्या सोबत होतो. पण त्या दिवशी माझा कुटुंब माझ्या सोबत नव्हतं साहेब. कार अॅक्सिडेंट मध्ये स्वाती आणि प्रिया दोघीही जागीच गतप्राण झाल्या होत्या. मी त्यावेळी त्यांच्या देहाच्या शेजारी बसून होतो साहेब. त्यांची एक एक वाक्य आठवत होती साहेब. पण मी काहीच करू शकत नव्हतो. दैवाने मला त्यांच्याशी शेवटचं बोलायची सुद्धा संधी दिली नव्हती. हा तेव्हढा वाचला होता. ह्याच्या पायाला आणि कमरेला जबरदस्त मार लागला होता.”

काही वेळ गोयनका साहेब शांत झाले होते. मग भानावर येऊन परत बोलायला लागले, ह्या गोष्टीला आता दोन वर्षे झाली. पण आज जेव्हा स्वाती नाही आहे तर मला जिवंत असून सुद्धा मेल्यासारखा वाटतं कधी कधी ….. आणि …….आज जाणवतं साहेब कि मी तिला कसं रोज मारलं होतं. तिला वेळ न देऊन! ……प्रियाला घट्ट धरून सांगायची इच्छा होते साहेब कि आज तिच्या बाबाच्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये त्याचं कुटुंब सोडून काहीच नाही आहे. मला …. तिची ….म … मा …”, गोयनका साहेबांना भरून आलं होतं. त्यांच्या तोंडून शब्द निघत नव्हते. पण गच्च भरून लाल झालेले त्यांचे डोळे बरेच काही सांगत होते. बरंच काही दडून होतं आत, जे बाहेर निघू पाहत होतं. कुळकर्णी साहेबांचा हात हळूच त्यांच्या खांद्यावर गेला. त्याला धरून गोयनका साहेब बोलायला लागले, “आज, साहेब आज जर माझ्या पोराने मला दिवसभर जरी थांबवले तरी मी थांबणार आहे. कारण आता माझ्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये फक्त हाच आहे.” असे म्हणून गोयनका साहेबांनी कुळकर्णी साहेबांचा निरोप घेतला आणि ते परत त्यांच्या मुलाकडे वळले. कुळकर्णी साहेबांना लिहिण्यासाठी खरं तर फार चांगला विषय मिळाला होता. पण कुळकर्णी साहेब स्तब्ध झाले होते. त्यांनी मनोमन कसला तरी निश्चय केला होता. भरलेल्या डोळ्यांनी ते वेगात घराकडे निघाले होते.