म्यानेजमेंट – ह्यांना त्रास काय असतो हो??

“वैभव!”

( “काय आहे बे आता?”)

हा मला हाक मारतोय ना, हा आहे माझा म्यानेजर. मी एफ.बी. वर लॉगीन व्हायचं आणि ह्याने, लेकाने, माझ्या सिस्टीम जवळ यायचं, ह्यात ह्याचं टायमिंग गेल्या दीड वर्षात कधीच चुकलं नाही! … पण करता काय? असो ….

“यस सर … ?”

“अरे वैभव, तुझं रेसिग्नेशनचं तर अपेक्षित नव्हतंच …. त्यात तू नोटीस पिरीयड सुद्धा सर्व्ह करायला तयार नाहीयेस …. का रे बाबा?”

(“तू पिळला तेव्हढा पुरे नाही का रे? … आता तरी जाऊ दे कि मायला!”)
“सर मला दुसरा जॉब मिळालाय … आणि त्यांना जॉयनिंग लवकर हवी आहे …आणि माझी प्रोजेक्ट तसाही संपलाच आहे. तर वाटलं कि तुम्हाला काही प्रोब्लेम नसेल … ”
(“नसता मिळाला तरी हेच म्हटलं असतं हलकटपूर नरेश! … तुमच्या राज्यात अजून राहिलो तर माझी असली नसली बुद्धी सुद्धा खपवणार तू!”)

“अरे हो रे. …. पण… म्हणजे. …”

हा असाच बोलतो …. ह्याच्या वाक्यातल्या शब्दांचं काहीच ताळ-तंत्र नसतं. वरून आपल्यालाच विचारणार, ‘Are we on the same page? … You got me right??’ …. सवय झालीये आता आम्हाला,असो ….

“अरे हो रे. …. पण… म्हणजे. …तसा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. …. म्हणजे … मला काय? …. मी तर …. मला तर खरं तर आनंद होतो आहे …. म्हणजे? …. मी … मला … नाही … हां …. तू समजला ना ?? …. तू सांग बिनधास्त … कधी जायचय ते …… मी सगळं सांभाळू शकतो!”

(“अरे! अरे! जिभेला सांभाळायला शिक कि आधी! बोलतोय काय … डोक्यात काय??? …. आणि मधेच बाजूने जाणाऱ्या ह्या राजलक्ष्मीला बघतोस काय? …. डोकं … (जर असेल तर), व जीभ आणि डोळे इकडे तिकडे पळवण्यापेक्षा एका गोष्टीवर लक्ष देशील तर आमची धावपळ कमी होईल रे …. नॉन-सेन्स!!”)
“सर मग के.टी. करून एक दहा दिवसात रिलीव्ह करा मला.”

“दहा दिवस!!! …. नाही! …. म्हणजे …. काम नसेल तर एकही दिवस रिकामा कंपनी मध्ये घालवायचा नाही ह्या मताचा आहे मी … आं? …. हा! …कसं आहे, काम नसेल ना, तर दुसऱ्या आठवड्यात पेपर टाकायलाच पाहिजे …. रिकामं बसून वेळ वाया घालवायचाच नाही. अरे मी सुद्धा तेच करेल .. मी सांगितलंय न तुला आधीच. ….हो ना?”

(“त्या हिशोबाने तर …., जॉईन केलास त्याच्या पुढच्याच आठवड्यात तू रिझाईन करायला पाहिजे होतं हलकटा!! जॉयनिंग फॉरम्यालिटीस सोडल्या, तर कामंच काय केलेस तू?”)
“हो सर. सांगितलंय तुम्ही. तर मग …. दहा दिवस पक्के समजू, मी सर??”

“हो..,हो!!! … म्हणजे …. बघ … माझ्या कडून काहीच प्रॉब्लेम नाहीये रे .. बाकी म्यानेजमेंट च्या हाती… ह्यांचा लेकांचा काही नेम नसतो रे …. मी सांगितलंय त्यांना! …. कि त्याचं मन नाहीये इथे … जाउद्या त्याला …. पण …. म्हणजे? …. मी … मला … नाही … हां …. तू समजला ना ??”

(“हां … बिलकुल समजलो सारं … म्हणजे तू काही मदत करणार नाहीयेस माणसा…”)
“बरोबर सर!”

“बाकी बरे केलेस तू वैभव, तशीही हि कंपनी तुझ्यासाठी बरोबर नाहीये … काय माहित काय सुरु आहे! … मी पण रिजाईन केले आहे. माहित आहे ना तुला?”

(“हां तो तुझ्या ड्राफ्ट मध्ये असलेला मेल बद्दल बोलतोय होए?? … तीन महिन्यांपासून किती लोकांना दाखवलास तू? ….. अरे किती लोकं तर खरंच आस लावून बसले आहेत कि तू निघशील इथून!!! … लोकांच्या भावनांसोबत असं खेळ करतो हलकटा? लवकरच वरच्याची लाथ बसणार आहे बघ तुला!!! “)

“कधी? केले सर? तुम्ही रिजाईन??”

“शुक्रवारी रे.”

(“शुक्रवारी होये!! …. अरे शुक्रवारी शेवटचे २ तास तुझाच मेल बॉक्स उघडून मीच विचार करत होतो तुझं रेसिग्नेशन सेंड करायचं म्हणून, तू काय थापा मारतो आहे मला!! … तुझा पासवर्ड माहित्ये मला. अॅडमिन ने दिलेला पासवर्ड सुद्धा बदलण्याची बुद्धी नाहीये तुला …. किती कष्ट लागलेत माहिती आहे सेंड वर क्लिक ‘न’ करण्यासाठी???!!! ….. पण तू काही सुधारायचा नाहीस … सेंड करूनच टाकतो थांब आज … अरे त्या डी.एम. चा पासवर्ड माहित नाही म्हणून सांग, नाहीतर तिकडून एक्सेप्ट सुद्धा केलं असतं मी तुझं रेसिग्नेशन!”)
“ठीक आहे सर. ऑल द बेस्ट!”

– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –

“वैभव”

(“आलास परत!”)

“डी.एम. बोलवतोय तुला…”

(“सोडताहेत कि काय? …. चांगली बातमी दे रे देवा!! “)
“आलोच सर.”

– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
“सर, मला बोलावले होते तुम्ही?”
(हा एच.आर. म्यानेजर काय करतोय इथे?? ….चांगली बातमी ….. चांगली बातमी ….. रिलीव्ह …. रिलीव्ह ….)

“हो वैभव.”

” ….वैभव तू २२ इंटरव्ह्यूस घेतलेत … पण एकही क्यांडीडेट् सिलेक्ट नाही केलास … ”

(हान तिच्या मायला …. मला वाटला सोडताहेत मला … )
“सर, प्रोफ़ाईल तितक्या चांगल्या नव्हत्या ….”

“का बरं चांगल्या नव्हत्या??”

(म्हणजे??? …. अरे चांगल्या नव्हत्या, म्हणजे, चांगल्या नव्हत्या!! … अजून काय आहे त्यात …. सायफर सायफर खेळतो आहे का आपण इथे!!!)
“म्हणजे सर? मी समजलो नाही.”

“म्हणेज वैभव, तुला २२ प्रोफाईल्स दिल्या होत्या आतावर …. अजून नाही आहेत प्रोफाईल …. काय करायचे सांग?”

(“नाच मग! … मी काय करू त्यात??”)
“सर मी काय करू शकतो … इथे जे काम करावं लागतं त्या हिशोबाने मला क्यांडीडेट्स ठीक नाही वाटले … काही क्यांडीडेट्सला तर सर साधी रिक्वायरमेंट सुद्धा कळत नाही सर…”

“एक मिनिट, रिक्वायरमेंट इंग्लिश मध्ये असते बरोबर? …. तू म्हणतो आहेस कि क्यांडीडेट्स ला इंग्लिश सुद्धा येत नाही?”

(“तुम्हाला तर नक्कीच येत नाही असं दिसतंय सर!!!! … अरे काय लावलं आहे हे?”)
समोरच्याच्या कानशिलावर वाजवायला उचलेला हाथ कसाबसा कपाळावर फिरवतो आहे असे दाखवत त्रासून मी समोर बघत होतो …

“तुला अजून दहा प्रोफ़ाईल्स देतो वैभव… ह्यातून कुणी तरी सिलेक्ट होईल ह्याची हमी देतोस का तू?” – इति ह्युमन-रिसोर्स-डीपार्टमेंट नरेश एच.आर. म्यानेजर.

(“तुझ्या डीपार्टमेंट मधल्या ज्या पोरीला तू लग्नाचं आश्वासन देऊन २ वर्षापासून फिरवतो आहेस, ती एक दिवस तुझ्या घरी जाऊन तुझ्या बायको पोरांसमोर तोंड उघडणार नाही ह्याची हमी देऊ शकतो का रे तू??? मला हमी मागतो आहे!”)
“सर मी हमी नाही घेऊ शकत ह्याची, प्रोफाईल ठीक वाटली तर ठीक, नाही तर नाही … आणि तसंही रिसोर्स म्यानेजमेंट माझं काम नाही. तुम्हाला सिलेक्ट करायचंच असले कुणाला तर करून टाका तुमच्याकडूनच. नंतर मला बोलणे नाही ऐकायचे कि ‘हे तू कुणाला सिलेक्ट केलंय?’ म्हणून.”

. . . . . . .
. . . . .
एच.आर. म्यानेजर आणि डी.एम. एक दुसऱ्याकडे बघताहेत ….
. . . .
. . . . .

“तुम्ही जाऊ शकता वैभव.”

– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –

म्यानेजमेंट! ….. कुणीही जॉब बदलण्याचं ८०% कारण!! ….नाही नाही. मी दुसरीकडे जॉईन करतांना एच.आर. ला आपण सांगतो त्या कारणाबद्दल बोलत नाहीये. मी, आपण दुसरा जॉब शोधणं सुरूं करायच्या खऱ्या-खुऱ्या नेमक्या कारणाबद्दल बोलतोय. काय म्हणता? तुम्ही नाही आहात सहमत? तुम्ही संतुष्ट आहात तुमच्या जागी?? हम्म …. भाग्यवान आहात मग तुम्ही … पण मी तर असं ऐकलं आहे कि ‘कर्मचारी कधीच म्यानेजमेंट कडून संतुष्ट राहू शकत नाही!’. निदान इथे तरी मानतात असं. आणि त्यामुळेच कदाचित म्यानेजमेंट कर्मचाऱ्याच्या असंतुष्टी ला खूप काही किंमत देत नाही.

बरं चला …… हे जरी मानलं कि ‘कर्मचारी कधीच म्यानेजमेंट कडून संतुष्ट राहू शकत नाही’, पण मला सांगा, म्यानेजमेंट तरी कर्मचाऱ्याकडून कधी संतुष्ट असतं का? मला तर नाही दिसत कुठेच, कधीच! ……. काही ना काही, …..कुठे ना कुठे, …… कुणी तरी असंतुष्टच असतो (कर्मचाऱ्याकडून)….

उदा.

तुम्ही आपला काम संपवून लवकर घरी जातो म्हटलं तर, . . . .

“नाही, शक्य नाही. पूर्ण ८ तास बसवाच लागेल. पॉलिसी आहे.”
. . . . .

“असं कसं काम नाही तुझ्याकडे? मी देतो थांब!” (आणि आलाच मग दोन पानांचा मेल तुमच्या मेल बॉक्समध्ये!!)
. . . . .

“आजचं झालं तर त्यात काय? उद्याचं कर.” (कधी कधी तर शेजारी पण येऊन बसतात हे लोकं, पण सोडणार नाही तुम्हाला!!!!)
. . . . .

बरं मग तुम्ही सकाळी ९:३० च्या ऐवजी १०:३० ला (एक तास उशिरा) येऊन ८ तास मात्र पूर्ण करून जरी जात असला, तर, . . . . .
“तू वेळेवर येत नाहीस … कम्प्लेंट आली आहे तुझ्या नावाची.” ( कुणी करत नसतं हं ह्या कम्प्लेंटस! हेच करत असतात….!)
. . . . .

त्यात तुम्ही पुरुष असाल तर, . . . . .
“एखाद्या बाईने म्हटलं असतं तर ठीक आहे, तुला कुठे सकाळी उठून डब्बा तयार करावा लागतो. (काम करायला बायको/आई असेलच.) प्लीस वेळेवर येत चल.”
. . . . .

आणि जर तुम्ही स्त्री असाल तर, . . . . .
“एखाद्या, अविवाहित पोराने असं म्हटलं असतं तर ठीक आहे, त्या वयात सवयी नसतात कि लवकर झोपेल माणूस. पण तुमच्या बाबतीत तर हे शक्य नाही. तेव्हा तुम्ही तर लवकर यायलाच पाहिजे.”
. . . . .

बर मग तुम्ही वेळेवर येऊन वेळेवर जायची गोष्ट केली तर, . . . .
“बघ तू असं सहकार्य नाही करशील तर कसं होईल? …. ज्या दिवशीचं काम त्या दिवशी संपायलाच पाहिजे.”

मग ती ८ तासांची पॉलिसी काय लोणचं घालायला ठेवली आहे काय?? …. माहित नाही.

. . . . .

२ महिन्यांचं काम एका महिन्यात करायला लावायचं, …. झालं नाही तर, . . . .
“काम तर तसा २०च दिवसांचं होतं, मला नाही कळत ह्याला हितके दिवस का लागताहेत!!!”

म्हणजे खापर हे तुमच्याच डोक्यावर फुटेल!! …. तो मात्र सुटला …

. . . . .

रिसोर्स पुल्लिंग मध्ये एकमेकांच्या रिसोर्सेस ची लावायची आणि रिसोर्स कॉमन असेल तर?? …… मग तर विचारायलाच नको!!!
. . . . .

मुलगी दिसायला चांगली असेल तर तिला आपल्या टीम मध्ये घ्यायचं, कारण काय? तर, . . . .
“नाही, ती कामात फार फार चांगली आहे रे … ”
. . . . आणि तीन दिवसात तिने ह्यांना जर काहीच भाव नाही दिला तर, . . . .

“मला कळत नाही हिला सिनियर कुणी बनवलं तर ….!”
. . . .

“तुला सांगतो ना, मुली नकोच टीम मध्ये, ह्यांच्याकडे ना काम ‘न’ करण्याचे बहाणेच जास्त असतात!”
. . . . .
. . . . .

अशी कितीतरी उदाहरणे देता येतील, म्यानेजमेंट कर्मचारी वर्गाकडून खुश नसण्याचे ….

ह्यांना त्रास काय असतो हो?? …. बरे खालचे तिथे गेले कि तेही तसेच बनतात हेही सत्य आहे. बघितलंय मी माणसं बदलतांना. जागेतच काही असावं बहुतेक.कि तिथे माणूस एकदा गेला, कि आपसूकच त्यात हे कौशल्य येत असावं.नाही तर काय सांगावं? किंवा असंही असेल कि प्रत्येकातच हि छुपी प्रतिभा असावी. आणि ती जागा, निमित्त मात्र असावी. काय वाटत?

बरं असंही नाही कि सगळे असेच असतात … काही असतातही चांगले, स्वच्छ!! …. पण मग तसे हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतात, असले तरी ते हि बिचारे प्रतिकूल वातावरणात जास्त काही करू शकत नाही. मग एक तर कंटाळून सोडून देतात, नाही तर चीड चीड करत एकटेच लढत राहतात.

काहीही असो, मला तर इतकं समजलं आहे, कि माणसं सगळीकडे सारखेच!! ….. त्यामुळे उगा जास्त जागा बदलण्याचा भानगडीत पडण्यात काही अर्थ नाही. पैसा देखो, और खुश रहो. नाही का?
म्हणून मी तरी आहे त्याच जागी राहणार आहे आणि वेळ घालवणार आहे. …..आणि तरीही …..फारच कंटाळा आलाच तर, . . . .
. . . . . .
आहेच एक मेल, एकाच्या ड्राफ्ट मधला, … उघडून सेंड करायचा आहे बस्स!!!!!!   😉  😀

Advertisements

निरुत्तर …

२०२५ पर्यंत भारत महासत्ता होईल असं विधान ऐकलेलं, वाचलेलं आठवतं. कलाम सारख्या महान व्यक्तीने सुद्धा तेच स्वप्न मनात बिंबवायला सांगितलं होतं. आम्ही तसं केलं देखील होतं. साठ वर्षाच्या कारकिर्दीत महासत्ता नसलो तरी, अमेरिका, ब्रिटन सारख्या देशांच्या ज्यांच्याकडे २००+, ६००+ वर्षा एव्हढा अनुभव आहे, आम्ही निदान त्यांच्याशी स्वतःची तुलना तर करू शकतो, ह्याचा अभिमान होता त्यावेळी. हळू हळू प्रगती करोतच आहे हा विश्वास होता तेव्हा. आणि २०२५ पर्यंत महासत्ता बनू शकतो हे कदाचित म्हणून खरं सुद्धा वाटत होतं. आणि का नाही वाटावं आम्हाला तसं? ६० वर्षात आम्ही जगातली ५वी मोठी आर्थिक सत्ता होतो. नव्हे आहोत. जगातली तेव्हा ३री (आता ४थी) सर्वात मोठी सेना आमच्याकडे होती. टेलिकॉम सेक्टर मध्ये केलेली प्रगती आमच्या एव्हढी कुठेही झालेली नव्हती. जगातली सर्वात जास्त पदवीधारक जनता आमच्याकडे होती, असेलही. आणि म्हणून आम्हाला आशा होती, … नव्हे … आम्हाला ठाम विश्वास होता. कि येणारा काळ हा आमचा होता. भविष्यातली महासत्ता आम्हीच होतो.

….. पण … ……मग हळूच कुठेतरी एकदा कॉमन वेल्थ गेम्स आमच्याकडे झालेत आणि त्यात झालेला हलगर्जीपणा आम्हाला लक्षात आला. अख्ख्या जगासमोर आमचे नाक कापल्या गेले. पण आम्ही नेहमी प्रमाणे शांत होतो. कारण, ‘त्यात काय झालं?’ ते बघायचं काम आमचं नव्हतं. ते काम तर आम्ही कलमाडी साहेबांना दिलं होतं. त्यात त्यांनी थोडीफार हेराफिरी केली होती. त्याला आम्ही काय करणार? त्याची लाज त्यांना वाटायला हवी होती ना. आम्ही कशाला वाईट वाटून घेणार होतो त्यात. ‘जाऊदे … मरू दे’ … म्हणून आम्ही तो मुद्दा सोडून दिला होता. कारण आम्ही तर महासत्ता बनणारच होतो. एका कलमाडी मुळे काय अडथळा येणार होता त्यात? असं काय आधी झालं नव्हतं काय आमच्या कडे?? …. बिलकुल झालं होतं. मुळी … हेच तर होत आलं होतं. जेव्हा, तेव्हा आमची प्रगती नाही थांबली तर आता कसली थांबणार होती ती??? आणि शेवटी आम्ही तर आमची रोजची कामं तर करतच होतो ना? … त्यामुळे आम्ही निवांत होतो.

… मग २ जी प्रकरण पुढे आलं … आम्हाला थोडं नवल वाटलं … आयला म्हटलं, हि काय भानगड?? स्पेक्ट्रम अन काय काय?? … कुतूहल म्हणून आम्ही त्यात लक्ष घातलं … आरोपी ठरवलेल्या कुणी राजा नावाच्या माणसाला धरण्यात आलं होतं … आणि पैसा जरा जास्तच खिश्यात घातला आहे हे समजत होतं … पण तेव्हढ्यात राडीयांची टेप बाहेर आली नि आम्ही राजाला काही वेळ विसरलो. .. नशीब आमचं कि राजाला तरीही आता घालण्यात आलं. … नाही. तसं नसतं झालं तरी आम्हाला काही फरक पडणार नव्हता. आम्ही तर काही घोटाळे केले नव्हते. दुसऱ्याला सद्बुद्धी नाही मिळाली वरच्याकडून ह्यात आम्ही काय करू शकत होतो तसंही? आणि वेळही कुठे होता आमच्याकडे तेव्हढा??!! …. पण जे झालं ते गॉसिप करायला छान वाटत होतं. मग थोडे अजून घोटाळे शोधण्यात आले. अजून गॉसिप मिळालं. रोजच्या मोनोटोनस आयुष्यातून कसं थोडं बाहेर आल्या सारखं वाटायला लागलं!!!

…. मग … मग आम्ही एक इतिहास घडवला. क्रिकेटच्या जगात आम्ही विश्वविजेते झालोत. कोरोडो लोकांची जी एक इच्छा होती, सचिनच्या हातात विश्वचषक बघण्याची, ती ह्यावेळी फार म्हणजे फार तीव्र झालेली होती. मग देव सुध्धा काय करणार?? केली बिचाऱ्याने सर्वांची इच्छा पूर्ण. … देश एक झाला!!! … सगळ्यांनी एकसाथ जल्लोष केला. … ह्याच एकतेचा फायदा उचलून कि काय … अण्णा हजारे नावाचा माणूस पुढे आला. त्याने सरकारची झोप उडेल असली चळवळ सुरु केली. लोकांनाही हलवून हलवून उठवायचा प्रयत्न झाला. काय सुरु आहे? … काय असायला हवं … कुठे चाललो आहे? … कुठे जायला हवं … हे आम्हाला ओरडून ओरडून सांगण्यात आलं. कुणी म्हणे अण्णा आपल्यासाठी लढतोय. कुणी म्हणे हि भाजप ची २०१४ साठी चा प्लान आहे. कुणी म्हणे कॉंग्रेस सगळं करतेय आणि शेवटी ते राहुल च्या मार्फत लोकपाल आणून वोट घेणार आहेत. आता मात्र आम्हीही जागे झालो होतो … खरं-खोटं आम्हालाही कळायला लागलं होतं … आणि आम्हाला विश्वास होता आता अजून काही चुकीचं घडणार नाही आहे. आता कुणी आम्हाला मूर्ख बनवणार नाही. का? कारण आता आम्ही पाऊल उचलणार होतो. आता आम्ही परत कुणाला चुका करू देणार होतो. आता आम्ही एक झालो होतो.

मग? …… मग आमच्या राज्यात निवडणुका झाल्यात. आणि आम्हाला वाटलं निकाल ह्यावेळी असला लागेल सगळ्यांना अद्दल घडेल एकदाची. …. पण?? … पण झालं तेच .. तेच? तेच जे नेहमी होत आलं होतं … परत आम्ही फेल झालो होतो! … पण कसं काय??? … आम्ही तर ठरवलं होतं. सगळ्यांनी!! … मग? … मग फक्त एकट्या मी काही नाही केलं तर त्याने असला काय फरक पडायला हवा होता का?? … साला म्हणजे हे बाकी लोक सुद्धा झोपलेच होते तर … !!!! … सगळे गप्पांचे बाजार मेले … कुणीच कामाचं नाही तर!!! … छ्या !!! …. ह्यांना काही फरक नाही पडत तर मग मी स्वतःला कशाला ताप लावून घेऊ मग? … मला काय आहे .. आज न उद्या एच १ मिळेलच … निघून जाईल मी बाहेर. पगार भेटेलच चांगला. आणि ह्याने कसले माझे विचार बदलणार आहेत देशाबद्दल? … माझे प्रेम जेव्हढ आधी होतं तेव्हा तेव्हाही राहिलाच देशासाठी. आज जेव्हढ्या ताकदीने वाटतं कि हे सगळं आम्ही थांबवायला हवं. हे तेव्हाही वाटेलच कि! … मग मी कुठे चुकतोय त्यात? … कुठेच तर नाही! आणि मी एकता करू तरी काय शकतो? … सगळे सोबत असतील तरच काही होऊ शकतं ना? … आणि जेव्हा इतरंना सुद्धा जादा फरक पडत नसेल तर मला देखील का पडावा ना?? … काय चूक आहे ह्यात? … नाही का?

… छान पैकी … भविष्यात दारात येणाऱ्या फोर व्हिलरची, जवळ असलेल्या बंगल्यांची स्वप्न बघत मी निवांत झोपलो. भविष्य दिसत होतो. देश जास्त काही बदलला नव्हता. मी आता तर राहतही नव्हतो तिथे. मी तर छान अमेरिकेत स्थायिक झालो होतो. ७-८ वर्षांची मुलगी सुद्धा होती. बायकोवर गेली होती ना! …. एक दिवस तिला तिच्या जागतिक इतिहासाच्या तासाला मग हि सध्या सुरु असलेल्या चळवळी बद्दल संक्षेपात शिकविण्यात आले … ती संध्याकाळी माझ्या मांडीवर येऊन मला त्या बद्दल विचारायला लागली. मी सुद्धा तिला जवळ घेऊन, ह्या कला बद्दल सांगायला लागलो. देश कसा जगायला लागला होता, ते सांगत होतो. अण्णा कसे निर्भय पणे लढले होते, आम्हीसुद्धा कशी महासत्ता बनायची ताकद ठेवत होतो, ते सांगत होतो … माझ्या चेहऱ्यावर अभिमान येत होता …. आणि मग तिने मला लगेच पुढचा प्रश्न विचारला … “बाबा, मग त्यावेळी तुम्ही काय करत होते?” ….

त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या कडे तेव्हा नव्हतं. आता झोप उडाली आहे. पण आत्ताही माझ्या कडे उत्तर नाहीये.