Monthly Archives: डिसेंबर 2011

निरुत्तर …

२०२५ पर्यंत भारत महासत्ता होईल असं विधान ऐकलेलं, वाचलेलं आठवतं. कलाम सारख्या महान व्यक्तीने सुद्धा तेच स्वप्न मनात बिंबवायला सांगितलं होतं. आम्ही तसं केलं देखील होतं. साठ वर्षाच्या कारकिर्दीत महासत्ता नसलो तरी, अमेरिका, ब्रिटन सारख्या देशांच्या ज्यांच्याकडे २००+, ६००+ वर्षा एव्हढा अनुभव आहे, आम्ही निदान त्यांच्याशी स्वतःची तुलना तर करू शकतो, ह्याचा अभिमान होता त्यावेळी. हळू हळू प्रगती करोतच आहे हा विश्वास होता तेव्हा. आणि २०२५ पर्यंत महासत्ता बनू शकतो हे कदाचित म्हणून खरं सुद्धा वाटत होतं. आणि का नाही वाटावं आम्हाला तसं? ६० वर्षात आम्ही जगातली ५वी मोठी आर्थिक सत्ता होतो. नव्हे आहोत. जगातली तेव्हा ३री (आता ४थी) सर्वात मोठी सेना आमच्याकडे होती. टेलिकॉम सेक्टर मध्ये केलेली प्रगती आमच्या एव्हढी कुठेही झालेली नव्हती. जगातली सर्वात जास्त पदवीधारक जनता आमच्याकडे होती, असेलही. आणि म्हणून आम्हाला आशा होती, … नव्हे … आम्हाला ठाम विश्वास होता. कि येणारा काळ हा आमचा होता. भविष्यातली महासत्ता आम्हीच होतो.

….. पण … ……मग हळूच कुठेतरी एकदा कॉमन वेल्थ गेम्स आमच्याकडे झालेत आणि त्यात झालेला हलगर्जीपणा आम्हाला लक्षात आला. अख्ख्या जगासमोर आमचे नाक कापल्या गेले. पण आम्ही नेहमी प्रमाणे शांत होतो. कारण, ‘त्यात काय झालं?’ ते बघायचं काम आमचं नव्हतं. ते काम तर आम्ही कलमाडी साहेबांना दिलं होतं. त्यात त्यांनी थोडीफार हेराफिरी केली होती. त्याला आम्ही काय करणार? त्याची लाज त्यांना वाटायला हवी होती ना. आम्ही कशाला वाईट वाटून घेणार होतो त्यात. ‘जाऊदे … मरू दे’ … म्हणून आम्ही तो मुद्दा सोडून दिला होता. कारण आम्ही तर महासत्ता बनणारच होतो. एका कलमाडी मुळे काय अडथळा येणार होता त्यात? असं काय आधी झालं नव्हतं काय आमच्या कडे?? …. बिलकुल झालं होतं. मुळी … हेच तर होत आलं होतं. जेव्हा, तेव्हा आमची प्रगती नाही थांबली तर आता कसली थांबणार होती ती??? आणि शेवटी आम्ही तर आमची रोजची कामं तर करतच होतो ना? … त्यामुळे आम्ही निवांत होतो.

… मग २ जी प्रकरण पुढे आलं … आम्हाला थोडं नवल वाटलं … आयला म्हटलं, हि काय भानगड?? स्पेक्ट्रम अन काय काय?? … कुतूहल म्हणून आम्ही त्यात लक्ष घातलं … आरोपी ठरवलेल्या कुणी राजा नावाच्या माणसाला धरण्यात आलं होतं … आणि पैसा जरा जास्तच खिश्यात घातला आहे हे समजत होतं … पण तेव्हढ्यात राडीयांची टेप बाहेर आली नि आम्ही राजाला काही वेळ विसरलो. .. नशीब आमचं कि राजाला तरीही आता घालण्यात आलं. … नाही. तसं नसतं झालं तरी आम्हाला काही फरक पडणार नव्हता. आम्ही तर काही घोटाळे केले नव्हते. दुसऱ्याला सद्बुद्धी नाही मिळाली वरच्याकडून ह्यात आम्ही काय करू शकत होतो तसंही? आणि वेळही कुठे होता आमच्याकडे तेव्हढा??!! …. पण जे झालं ते गॉसिप करायला छान वाटत होतं. मग थोडे अजून घोटाळे शोधण्यात आले. अजून गॉसिप मिळालं. रोजच्या मोनोटोनस आयुष्यातून कसं थोडं बाहेर आल्या सारखं वाटायला लागलं!!!

…. मग … मग आम्ही एक इतिहास घडवला. क्रिकेटच्या जगात आम्ही विश्वविजेते झालोत. कोरोडो लोकांची जी एक इच्छा होती, सचिनच्या हातात विश्वचषक बघण्याची, ती ह्यावेळी फार म्हणजे फार तीव्र झालेली होती. मग देव सुध्धा काय करणार?? केली बिचाऱ्याने सर्वांची इच्छा पूर्ण. … देश एक झाला!!! … सगळ्यांनी एकसाथ जल्लोष केला. … ह्याच एकतेचा फायदा उचलून कि काय … अण्णा हजारे नावाचा माणूस पुढे आला. त्याने सरकारची झोप उडेल असली चळवळ सुरु केली. लोकांनाही हलवून हलवून उठवायचा प्रयत्न झाला. काय सुरु आहे? … काय असायला हवं … कुठे चाललो आहे? … कुठे जायला हवं … हे आम्हाला ओरडून ओरडून सांगण्यात आलं. कुणी म्हणे अण्णा आपल्यासाठी लढतोय. कुणी म्हणे हि भाजप ची २०१४ साठी चा प्लान आहे. कुणी म्हणे कॉंग्रेस सगळं करतेय आणि शेवटी ते राहुल च्या मार्फत लोकपाल आणून वोट घेणार आहेत. आता मात्र आम्हीही जागे झालो होतो … खरं-खोटं आम्हालाही कळायला लागलं होतं … आणि आम्हाला विश्वास होता आता अजून काही चुकीचं घडणार नाही आहे. आता कुणी आम्हाला मूर्ख बनवणार नाही. का? कारण आता आम्ही पाऊल उचलणार होतो. आता आम्ही परत कुणाला चुका करू देणार होतो. आता आम्ही एक झालो होतो.

मग? …… मग आमच्या राज्यात निवडणुका झाल्यात. आणि आम्हाला वाटलं निकाल ह्यावेळी असला लागेल सगळ्यांना अद्दल घडेल एकदाची. …. पण?? … पण झालं तेच .. तेच? तेच जे नेहमी होत आलं होतं … परत आम्ही फेल झालो होतो! … पण कसं काय??? … आम्ही तर ठरवलं होतं. सगळ्यांनी!! … मग? … मग फक्त एकट्या मी काही नाही केलं तर त्याने असला काय फरक पडायला हवा होता का?? … साला म्हणजे हे बाकी लोक सुद्धा झोपलेच होते तर … !!!! … सगळे गप्पांचे बाजार मेले … कुणीच कामाचं नाही तर!!! … छ्या !!! …. ह्यांना काही फरक नाही पडत तर मग मी स्वतःला कशाला ताप लावून घेऊ मग? … मला काय आहे .. आज न उद्या एच १ मिळेलच … निघून जाईल मी बाहेर. पगार भेटेलच चांगला. आणि ह्याने कसले माझे विचार बदलणार आहेत देशाबद्दल? … माझे प्रेम जेव्हढ आधी होतं तेव्हा तेव्हाही राहिलाच देशासाठी. आज जेव्हढ्या ताकदीने वाटतं कि हे सगळं आम्ही थांबवायला हवं. हे तेव्हाही वाटेलच कि! … मग मी कुठे चुकतोय त्यात? … कुठेच तर नाही! आणि मी एकता करू तरी काय शकतो? … सगळे सोबत असतील तरच काही होऊ शकतं ना? … आणि जेव्हा इतरंना सुद्धा जादा फरक पडत नसेल तर मला देखील का पडावा ना?? … काय चूक आहे ह्यात? … नाही का?

… छान पैकी … भविष्यात दारात येणाऱ्या फोर व्हिलरची, जवळ असलेल्या बंगल्यांची स्वप्न बघत मी निवांत झोपलो. भविष्य दिसत होतो. देश जास्त काही बदलला नव्हता. मी आता तर राहतही नव्हतो तिथे. मी तर छान अमेरिकेत स्थायिक झालो होतो. ७-८ वर्षांची मुलगी सुद्धा होती. बायकोवर गेली होती ना! …. एक दिवस तिला तिच्या जागतिक इतिहासाच्या तासाला मग हि सध्या सुरु असलेल्या चळवळी बद्दल संक्षेपात शिकविण्यात आले … ती संध्याकाळी माझ्या मांडीवर येऊन मला त्या बद्दल विचारायला लागली. मी सुद्धा तिला जवळ घेऊन, ह्या कला बद्दल सांगायला लागलो. देश कसा जगायला लागला होता, ते सांगत होतो. अण्णा कसे निर्भय पणे लढले होते, आम्हीसुद्धा कशी महासत्ता बनायची ताकद ठेवत होतो, ते सांगत होतो … माझ्या चेहऱ्यावर अभिमान येत होता …. आणि मग तिने मला लगेच पुढचा प्रश्न विचारला … “बाबा, मग त्यावेळी तुम्ही काय करत होते?” ….

त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या कडे तेव्हा नव्हतं. आता झोप उडाली आहे. पण आत्ताही माझ्या कडे उत्तर नाहीये.